ओळख आणि संस्कृती

पंचायत राज व्यवस्थेमधील त्रिस्तरीय पातळीपैकी एक असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील “ग्रामपंचायत टेंभ्ये – हातिस” ही गावाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी कार्यतत्पर आहे. गावातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी व गाव प्रगतशील बनवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असते.

ग्रामपंचायत टेंभ्ये – हातिस काजळी नदीकिनारी वसलेले आहे. टेंभ्ये येथील श्री देव भैरी जुगाई मंदिरामधील शिमगोत्सव विशेष असतो. येथील पालखीची भेट रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी देवस्थान येथे भेटीसाठी जाते. तसेच हातिस येथील पिर बाबरशेख दर्गा येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला होणारा उरुस संपूर्ण जिल्हयात प्रसिध्द आहे. हा उरुस दोन दिवस मोठया श्रध्देने साजरा केला जातो. या उरुसासाठी लाखो भाविक उपस्थित असतात.

साजरे होणारे सण

टेंभ्ये गावातील सण-उत्सव पारंपारिक पद्धतीने, उत्साह आणि एकोप्याने साजरे केले जातात.

गणेशोत्सव – गावामध्ये घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. प्रत्येक घरात आरत्या, भजन आणि विविध गोड पदार्थ बनवून गणरायाचे स्वागत केले जाते. या सणात भक्तगणांचा आनंद आणि श्रद्धा स्पष्टपणे दिसून येते.

दिपावली – दिपावली सणात घरोघरी सुंदर रांगोळ्या काढल्या जातात, स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवले जातात आणि दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण गाव उजळून निघते. आनंद आणि उत्साहाने हा सण साजरा केला जातो.

शिमगोत्सव – कोकणातील पारंपारिक आणि महत्त्वाचा सण असलेला शिमगोत्सव टेंभ्ये येथेही मोठ्या थाटात साजरा होतो. या सणात नृत्य, रंगोत्सव आणि आनंदाचे वातावरण असते. ग्रामदेवतेची पालखी गावातील प्रत्येक घरात भेटीसाठी नेली जाते, ज्यामुळे गावात एकात्मतेचे वातावरण निर्माण होते.

गुढीपाडवा – मराठी नववर्षाचा स्वागत सण म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. घरोघरी गुढी उभारून आनंदाने आणि उत्साहाने नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढी हे विजयाचे आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते.

नवरात्र व दसरा – नवरात्र काळात ग्रामदेवतेच्या मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस पूजाअर्चा, कार्यक्रम आणि भजन आयोजित केले जातात. गावकरी श्रद्धेने देवतेसमोर खण, नारळ आणि ओटी अर्पण करून नतमस्तक होतात. नऊ दिवसांच्या भक्तीमय वातावरणानंतर दहाव्या दिवशी ‘दसरा’ सण साजरा केला जातो.

स्थानिक मंदिरे

टेंभ्ये येथे श्री देव भैरी जुगाई मंदिर हे गावाचे ग्रामदैवत असून गावकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. तसेच येथे श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री साई मंदिर, श्री भराडीन मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठ अशी अन्य प्रमुख देवस्थानेही आहेत. याशिवाय हातिस येथेही श्री देव भैरी जुगाई मंदिर आणि पिर बाबरशेख दर्गा ही पवित्र स्थाने आहेत, ज्यामुळे या परिसराला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोककला

टेंभ्ये – हातिस गावात सांस्कृतिक परंपरा आजही जिवंत आहे. येथे भजन मंडळांमार्फत नियमित भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यातून भक्तीभाव आणि सामाजिक एकोपा दिसून येतो. तसेच गावात नमन मंडळ असून त्यांचे विविध ठिकाणी सादरीकरणाचे कार्यक्रम होतात, ज्यामुळे पारंपारिक लोककलेला प्रोत्साहन मिळते. याशिवाय, स्त्रियांची मंगळागौर हा लोककलेचा महत्त्वाचा भाग असून, त्यात खेळ, गाणी आणि पारंपारिक नृत्य यांद्वारे स्त्रिया आपली सांस्कृतिक परंपरा जपतात.

गौरवशाली व्यक्ती

अ.क्र.नाव
1मुकुंद विठठल साळवी
2प्रविण बाळराम साळवी
3बाबूराव विठठल तळेकर
4किशोर शंकर साळवी
5सुहास बापू साळवी

स्थानिक पाककृती

टेंभ्ये – हातिस गावातील ग्रामस्थ विविध पाककृती बनवतात. आंबा मोठया प्रमाणात होत असल्याने आंब्यापासून आंबापोळी, आमरस, आंबावडी तसेच कच्च्या आंब्यापासून कैरीचे पन्हे, लोणची इ. बनवले जातात. रातांब्यापासून कोकम व कोकम सरबत बनवले जाते. नारळ मोठया प्रमाणात असल्याने नारळीभात, नारळाची वडी, मोदक बनवले जातात. फणसापासुन फणसाची पोळी, तळलेले फणसाचे गरे, फणसाची भाजी बनविली जाते.

हस्तकला

टेंभ्ये गावातील हस्तकला हा स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. येथे पारंपारिक मातीचे दगडी शिल्प, विणकाम, झोपाळ्यांच्या आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंचे कारागिरी आढळते. तसेच, मातीच्या गणपती, देवी-देवतांचे मूर्तिकला, रंगीत रांगोळी कला या हस्तकलेतून गावाची सांस्कृतिक ओळख दिसून येते. या कला-हस्तकलेमुळे टेंभ्ये गावाची परंपरा, कलात्मक कौशल्य आणि स्थानिक वारसा जतन होतो.